- नातेवाईकांनी घाबरुन जावू नये, महापौरांचा धीराचा सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असुन कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी घाबरुन जावू नये, असा धीराचा सल्ला महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी शहरवासियांना दिला.
पिंपरी येथील जम्बो कोविड रुग्णालयास आज महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी समक्ष भेट देवुन येथील रुग्णांची तसेच त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांची विचारपूस केली. रुग्णालय व्यवस्थापनाच्या कामकाजाची माहितीदेखील यावेळी घेतली. रुग्णांना दिले जाणारे औषधोपचार, भोजनाची व्यवस्था तसेच रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवठा, वयोवृध्द रुग्णांना ने-आण करण्याची व्यवस्था, कर्मचारी व्यवस्थापन, रुग्ण दाखल करण्याची पद्धत, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असलेले प्रतिक्षालय याबाबत इत्यंभूत माहिती घेतली. कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याबाबत योग्य माहिती संबंधित डॉक्टरांनी देणे आवश्यक आहे. चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने गांभीर्याने या गोष्टीची काळजी घ्यावी, असे महापौर म्हणाल्या.
मृतदेह हस्तांतर करताना कुठलीही दिरंगाई होणार नाही त्याचप्रमाणे मृतदेहास टॅग लावण्याबाबत योग्य ती दक्षता घेण्याच्या सुचना स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे यांनी केल्या.
राज्यासह पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी जम्बो हॉस्पिटल उभारले आहेत. यामध्ये ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची व्यवस्था करुन देत कोरोना संसर्ग रुग्णांना सेवा देण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातुन रुग्ण याठिकाणी उपचारासाठी दाखल होत आहेत. यामुळे या सर्व रुग्णालयांवर अतिरिक्त भार पडलेला आहे. तरीही शहरातील कोरोना संसर्ग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असुन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी अफवांकडे दुर्लक्ष करुन महापालिकेच्या प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे. तसेच उपचार सुरु असताना घाबरुन न जाता उपचार घेतल्यास निश्चितच आपण कोरोनाचा पराभव करु असा विश्वास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी रुग्ण व त्यांचे नातेवाईकांसोबत संवाद साधताना व्यक्त केला. महापालिकेने नेमून दिलेले डॉक्टर्स व त्याबरोबर रुग्णालय व्यवस्थापनाचे डॉ. संग्राम कपाले, प्रिती व्हिक्टर यांनाही रुग्णालय व्यवस्थापनाबाबत आवश्यक त्या सुचना केल्या.