१४ लाखांची विदेशी दारू जप्त; भोसरी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२१) :- विदेशी दारूचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी आरोपी हा दारू विक्री करीत होता. तसेच १४ लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा मिळून आला. आरोपी याच्याकडे चौकशी केली असता आरोपी आसवानी यांची ही दारू असल्याचे त्याने सांगितले.
लॉकडाऊन असल्याने चढ्या भावाने या दारूची विक्री करत असल्याचेही त्याने सांगितले. तसेच आणखीन कडक लॉकडाऊन लागल्यानंतर दारूची तीन पट जास्त किमतीने विक्री करणार होतो, असेही त्याने सांगितले. भोसरी पोलिसांनी कारवाई करून १४ लाखांचा मद्यसाठा जप्त केला. कासारवाडी, नाशिकफाटा येथे फाल्कन बस लाईन्स प्रायव्हेट लिमिटेड येथे ही कारवाई करण्यात आली.
पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.प्रकाश किंमतराम आसवानी (रा. पिंपरी), नामदेव डोंगरे (रा. काळेवाडी), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.