- आधीच्या वाया डोसची माहिती चुकली; पालिका प्रवक्त्यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२१) :- दिवसाला पंचवीस हजारांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची उद्दिष्ट ठेवणाऱ्या महापालिकेत दिवसाला दहा हजार लसीकरण होत आहे. सव्वातीन लाख लसीकरण झाले. डोस वाया जाण्याचे प्रमाण अधिक आहे. ३३ हजार डोस वाया गेले असताना आठ हजार डोस वाया गेल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली होती. यावरून डोसची लपवाछपवी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केवळ साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण मंदावले आहे. दिनांक १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. महापालिकेच्या ६० आणि खासगी १८ अशा ७८ ठिकाणी लसीकरण केले जात आहे. लसीचा तुटवडा असल्याने काही केंद्रे बंद करावी लागली आहेत. लसीचा साठा संपल्याने एके दिवशी लसीकरण ठप्प झाले होते.
महापालिका प्रवक्ते शिरीष पोरेडी म्हणाले, लसीकरण करताना वाया गेलेल्या डोसची माहिती चुकली होती. कोव्हिशिल्डचे ३१ हजार ३०० आणि कोव्हॅक्सीनचे २ हजार ६०० असे ३३ हजार ९०० डोस वाया गेले आहेत. आजपर्यंत ३ लाख ३३ हजार ९३५ जणांचे लसीकरण झाले आहे. महापालिकेकडे सध्या कोव्हिशिल्डचे १५ हजार ८३० आणि कोव्हॅक्सीनचे ११ हजार ७५० असे २७ हजार ५८० लसीचे डोस शिल्लक आहेत.