- नगरसेवक शत्रुघ्न काटेंची पालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत संसर्गाची भीती न बाळगता पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस दल अहोरात्र काम करीत आहे. त्यांना संसर्गाची जास्त शक्यता आहे. त्यासाठी पोलीस आयक्त कृष्ण प्रकाश व अन्य अधिकारी तसेच डीवाय पाटील विदयापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या संकल्पनेतुन डी-वाय पाटील हॉस्पीटलमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोनाबाधित पोलीसांसाठी कोविड सुसज्ज वार्ड तयार करण्यात आला. शुक्रवारी (दि. २३) पासून तो कार्यरत झाला आहे.
याच धर्तीवर पालिकेच्या सेवेतील डॉक्टर, परिचारिका, आशा कर्मचारी व इतर फ्रंटलाइन वर्करदेखील आज अहोरात्र संसर्गाची तमा न बाळगता कार्यरत आहेत. या कोविड योदध्यांना तसेच त्यांच्या कुटूंबियांना संसर्ग झाला अगर काही आपातकालीन स्थिती निर्माण झाली तर त्यांना देखील प्राधान्याने व तातडीने उपचार व आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा महानगरपालीकेने तात्काळ देणे आवश्यक आहे.
परंतू आजमितीस या कोविड योध्यांसाठी अशा प्रकारची तात्काळ उपचारासाठीची तरतुद नाही. महानगरपालिकेने देखील आपल्या सेवेतील कोविड योध्यांसाठी अशा प्रकाराची राखीव सुसज्ज वार्ड व विनाविलंब वैदयकीय सेवा मिळणेसाठी तरतुद तात्काळ करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.