- “मायक्रो वॅक्सिनेशन प्लॅन” शिवाय “मृत्युदर” घटणार नाहीत – विजय पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- सध्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. लॉकडाऊन चे सर्व पर्याय आता निष्फळ होताना दिसून येत आहेत. कोरोनाचा दुसरा म्युटेंट घातक ठरत आहे. परिस्थिती वेळेत सावरली नाही तर मात्र पिंपरी चिंचवड व पुणे शहरात मृत्यूचे आकडे वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या वैरीएन्ट देशात प्रवेश केल्यामुळे संशोधक व वैदयकीय जगतात खळबळ माजली आहे. त्याकरिता आता प्रशासनाने वेगाने पावले उचलने आवश्यक आहे. याकरिता आता एकच पर्याय दिसून येत आहे ते म्हणजे कोविशील्ड व इतर लसीचे वॅक्सिनेशन जलद गतीने करणे आवश्यक आहे, असे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
शनिवारी पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुळे ७१ जणांचा बळी गेला आज तो आकडा ८५ आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण आपल्या दोनही शहरात घातक रित्या वाढत आहे. स्मशानामध्ये सुद्धा आता मृतदेह प्रतिक्षेवर आहेत. प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहे. परंतु असे असूनही मृत्यू दर गेल्या पंधरा दिवसांपासून कमी होताना दिसून येत नाही. याकरिता आता लसीकरण मोहीम योग्य नियोजन करून १६ मे पर्यत संपवता येऊ शकेल, त्याकरिता प्रशासन, स्वयंसेवी संस्था, आणि परिसरातील सर्व रुग्णालये,लस केंद्रे यांनी एकत्रितपणे मोठया प्रमाणात लसीकरण राबविणे आवश्यक आहे.
शहरात १८ वर्षाच्या पुढे १५ लाख नागरिक आहेत. प्रभाग निहाय विचार केला तर ६४ प्रभागांचे १६ भाग करून दरोरोज एका भागावर सर्व यंत्रणेने एकत्रितपणे मायक्रो पद्धतीने लसीकरण केले तर १६ भागांचे लसीकरण १६ मे पर्यंत संपुष्टात येईल. यालाच “मायक्रो वॅक्सिंनेशन प्लॅन” असेही संबोधता येईल. अतिशय सुनियोजितपणे १ मे पासून सदरचा कॅम्पेन दोनही राबवता येईल. दरोरोज चार प्रभागातील १ लाख जणांना लसीचे डोस दिले तर शहर कोरोना मुक्तीकडे पाऊल टाकताना दिसून येईल. शहराच्या अ,ब,क,ड,ई,फ अश्या सहाही प्रभागांचे योग्य नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात लसीकरण शक्य आहे. फक्त प्रशासनाने सर्वांसोबत तातडीने एकत्रितपणे नियोजन करावे अजूनही आपल्याकडे नियोजनासाठी ६ दिवस आहेत.
एप्रिल अखेरपर्यंत सर्व संबंधित वैदयकीय अधिकारी ,पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, खाजगी रुग्णालयाचा वैदयकीय स्टाफ, मेडिकल फोर्स युनिट, यांची मदत घेऊन लसीकरण टीमचे मजबुतीकरण करता येईल. अश्या मायक्रो वॅक्सिंनेशन प्लॅन चे नियोजन राज्यसरकार ला व केंद्र सरकारला तातडीने कळवावे “सिरम” सारखी जागतिक कंपनी आपल्या पुण्यात असल्याकारणाने दोनही शहरांसाठी लागणारे दरोरोज चे २ लाख डोस तातडीने उपलब्ध होतील. त्यातच सिरम कंपनीने लसीचे किंमत कमी केल्या असल्याकारणाने दोन्ही पालिकांना सदरचे डोस विकतही घेता येतील. अश्या पद्धतीने नियोजनबद्ध पणे काम केले तरच कोरोना संकटातुन आपली शहरे बाहेर पडतील अन्यथा शहरातील मृत्यूचे “तांडव” रोखणे कोणालाच शक्य होणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.