- मोरवाडी, काळेवाडी, पिंपळे गुरव व पिंपरीतील स्मशानभूमींचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या मृतांच्या अंतिम संस्कारासाठी निगडी, सांगवी, भोसरी, लिंकरोड चिंचवड व नेहरुनगर परिसरातील स्मशानभूमी या ठिकाणी विद्युत दाहिनीसह लाकूड सरणावरती अंत्यविधी करण्यास पालिकेने यापूर्वीच मान्यता दिली आहे.
तरीही अंत्यविधीसाठी विलंब होत आहे. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील आणखी ४ स्मशानभूमीमध्ये कोरोना बाधित मृतदेहांवर पुढील आदेश होईपर्यंत अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिलेली आहे.
त्यात मोरवाडी, काळेवाडी नदी जवळील स्मशानभूमी, पिंपळे गुरव व पिंपरी नगर (काळेवाडी पुलाजवळील) स्मशानभूमीचा समावेश आहे. या ठिकाणीदेखील कोविड बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कोविड बाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी आवश्यक लाकूड सरण उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी स्मशानभूमीतील काळजीवाहकावर राहील, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
















