- शहरातील सोसायट्यांना पालिकेचा दिलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- कोरोनाबाधित रुग्ण स्वतंत्र राहिल्यास घरच्यांना व इतर कोणालाही कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. त्यासाठी असे रुग्ण आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये आयसोलेशन सेंटर उभारण्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने परवानगी दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यासाठी महानगरपालिकेमार्फत वैद्यकीय व्यवस्था व इतर सर्व व्यवस्था पुरविण्याचे काम चालू आहे. होम आयसोलेशनमध्ये रुग्ण राहण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने घरांमधील व शेजारच्यांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
आयसोलेशन सेंटरमध्ये रुग्णांसाठी लागणारे बेडस्, स्वच्छतागृह, पाणी, दैनंदिन स्वच्छता व घरुन जेवण आणण्यास तसेच मनपाने घालून दिलेल्या अटींची पुर्तता करुनच होम आयसोलेशन सेंटर सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आयसोलेशन सेंटर सुरु केल्याबाबतची माहिती नजीकच्या मनपा रुग्णालयाला कळविण्यात यावी.
तसेच उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची किंवा नजीकच्या मनपा रुग्णालयाची मदत उपलब्ध करुन घ्यावी. कोरोना बाधित रुग्ण सदर आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल केल्यास कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. त्यामुळे सोसायटीमधील क्लब हाऊसमध्ये कोविड आयसोलेशन सेंटर सुरु करण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.
















