- डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे तब्बल पाच तासानंतर शस्त्रक्रिया यशस्वी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२१) :- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात १५ वर्षीय मुलीवर स्वादुपिंड या ग्रंथीशी संबंधित कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अतिशय गुंतागुंतीची व जोखमीची ही शस्त्रक्रिया होती. त्यामुळे तब्बल पाच तास शस्त्रक्रिया चालली व रुग्ण शस्त्रक्रियेतून सुखरूप बाहेर आला आहे.
पोटात दुखणे, मळमळ होणे, वारंवार उलट्या ही लक्षणे दिसल्यामुळे रुग्णाला वायसीएममध्ये दाखल करण्यात आले. भूक मंदावल्याने रुग्णांचे वजन कमी होऊ लागले. सुरुवातीला पोटातील लहान आकाराची असलेली गाठ लगेच वाढून मोठ्या आकाराची झाली. सिटी स्कॅन आणि एमआरसिपीमध्ये रुग्णांच्या पोटात १०x१४४१४ सेंटीमीटर आकाराचा स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे दिसून आले.
ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची व जटिल स्वरूपाची असल्याचे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. संतोष थोरात यांनी सांगितले. त्यानंतर १२ एप्रिलला ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तर २४ एप्रिलला रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला, असे वायसीएमचे अधिष्ठाता. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्याकरिता डॉ. बालाजी धायगुडे, डॉ. मारोती गायकवाड, डॉ. आनंद झिंगाडे, डॉ. मनीषा सपाटे, डॉ. कांचन वायकुळे, डॉ. हर्षद गावडे, डॉ. आशिष यादव, डॉ. विळासकर यांनी परिश्रम घेतले.
















