- रेमडेसिविर इंजेक्शनसाठी तब्बल ४८ हजारांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२१) :- कोरोना रुग्णांसाठी उपयोगी असलेले रेमडेसिविर इंजेक्शनचा शहरात काळाबाजार होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी सापळा रचून भोसरी एमआयडीसी येथून रविवारी (दि. २५) एकाला पकडण्यात आले. त्याच्याकडून रेमडेसिविरच्या तीन बाटल्या जप्त केल्या. इंजेक्शनसाठी १६ हजार याप्रमाणे तीन इंजेक्शनसाठी ४८ हजार रुपयांची त्याने मागणी केली होती.
कृष्णा भास्कर हावणे (वय २५, रा. इंद्रायणीनगर, भोसरी, मूळ रा. खडकी, ता वडवणी, जि.बीड), असे आरोपीचे नाव आहे. पुणे येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक भाग्यश्री यादव यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी – चिंचवड पोलिसांचा सामाजिक सुरक्षा विभाग व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने रविवारी (दि. २५) सापळा रचून कारवाई केली.
















