- नागरिकांनी खर्च करू नये; काळजीवाहक संस्थांवर अंत्यविधीची जबाबादारी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२१) :- कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिका पारंपरिक पद्धतीचा अवलंब करणार आहे. यासाठी लाकुड, गोवऱ्यांचा वापर केला जाणार आहे. यासाठी प्रति पार्थिव सहा हजार रुपयांच्या खर्चाचा भार महापालिका उचलणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तीवर पारंपारिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकुड आणि सरणाची महापालिकेमार्फत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
कोरोनाबाधित मृत व्यक्तींच्या पार्थिवावर महापालिकेच्या विद्युत आणि गॅस दाहिनीमध्ये अंत्यविधी करण्यात येत आहेत. तथापि, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येमुळे निगडी, सांगवी, भोसरी, लिंकरोड, चिंचवड आणि नेहरुनगर येथील पारंपारिक स्मशानभूमीमध्ये कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाबाधित व्यक्तींच्याअंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले लाकुड आणि सरणाची उपलब्धता करण्यासाठी स्मशानभूमींकरिता काळजीवाहू म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या संस्थांमार्फत लाकुड आणि सरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठीचा खर्च त्यांच्या मासिक बिलामध्ये अदा करण्यात येणार आहे. एका पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ६ हजार रुपये दिले जाणार आहेत.
निगडी स्मशानभूमीसाठी शुभम उद्योग, सांगवीसाठी महालक्ष्मी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, भोसरीसाठी शुभम उद्योग, लिंकरोड चिंचवडसाठी जयभवानी एंटरप्रायझेस, नेहरूनगरसाठी जयभवानी एंटरप्रायझेस काळजीवाहक सस्थावर अंत्यविधीची जबाबादारी सोपविण्यात आली आहे. या सर्व स्मशानभूमीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकूड, सरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.