- आयएमए देणार कोविड रुग्णांना उपचाराचे पॅकेज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२१):- गृह विलगीकरणातील रुग्णांना वैद्यकीय उपचार हवे असल्यास १० हजार रुपये मोजावे लागणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या प्रस्तावाला पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे. त्याबदल्यात संबंधित रुग्णांना एक वेळ तपासणी आणि गरज भासल्यास ५ मिनिटे फोनद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. ही बाब ऐच्छिक असली तरी देखील आजारपणात नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, भोसरी शाखा व आयुक्त राजेश पाटील यांची ५ एप्रिल रोजी बैठक झाली. असोसिएशनच्या डॉक्टरांमार्फत गृह विलगीकरणातील रुग्णांना रोज फोनद्वारे वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे; मात्र त्यासाठी रुग्णांकडून १० हजार रुपये घेण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यासाठी ४५ खासगी डॉक्टरांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
रुग्णांना गरज असल्यास या डॉक्टरांशी संपर्क साधून संबंधितांकडून उपचार घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. हे डॉक्टर गृह विलगीकरणातील रुग्णांची एक वेळ तपासणी व रोज केवळ ५ मिनिटे फोनद्वारे संवाद करणार आहेत. रुग्णांची रोजची माहिती नमूद केली जाईल. त्यानुसार औषधे कोणती घ्यावीत, हे डॉक्टर सांगतील.
फोनवरील दहा दिवस वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णांनी १० हजार रुपये द्यायचे आहेत. याबाबत कोणतीही सक्ती नसून हा ऐच्छिक विषय असल्याचे आयुक्त सांगत आहेत; मात्र सध्याची परिस्थिती पाहता रुग्णांची अडचण पाहून त्यांची आर्थिक लूट होत आहे, असा प्रश्न शहरातील सामाजिक संघटना उपस्थित करत आहेत.