- भोसरी, पिंपरी, आकुर्डी व थेरगाव रुग्णालयांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका भोसरी, जिजामाता, आकुर्डी व थेरगाव या चार नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन जनरेटर प्लांटची उभारणी करणार आहे. ऑक्सीजन प्लांट निर्मीती करणा-या कंपनीकडे ऑक्सीजन प्लांटची मागणी दिवसेंदिवस वाढू लागल्याने पुढे याचीही कमतरता पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेवून महापालिकेने तातडीने ऑक्सीजन जनरेटर प्लांट बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
सद्यस्थितीमध्ये शहरात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रुग्णांची धावाधाव होत आहे. ऑक्सीजनच्या अभावामुळे राज्यात अनेक दुर्घटना घडतांना दिसून येत आहे. भविष्यामध्ये शहरात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भोसरी, जिजामाता, आकुर्डी याठिकाणी ९६० एलपीएम व थेरगाव रुग्णालयात १०५० एलपीएम क्षमतेचे ऑक्सीजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत. या चारही रुग्णालयांच्या माध्यमातून जवळपास ४५० ऑक्सीजन बेड व ५० व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी हा प्लांट उपयुक्त ठरणार आहे.
ऑक्सीजन तयार करणा-या कंपन्यांकडे दिवसेंदिवस मोठया प्रमाणात मागणी वाढत असल्याने या कंपन्यांकडून शहरातील रुग्णालयांना ऑक्सीजन पुरवठा करण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा विचार करून भोसरी, जिजामाता, आकुर्डी व थेरगाव या चार ठिकाणी ऑक्सीजन जनरेटर प्लांट बसविल्यामुळे ऑक्सीजनचा कायमचा प्रश्न मिटणार असून यामुळे मोठया प्रमाणात ऑक्सीजनची बचत होणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.


















