- आरबीआयच्या मान्यतेची प्रतीक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२१) :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने रुपी को ऑपरेटिव्ह बँकेच्या विलीनीकरणाचा ठराव करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठविला आहे. रुपी विलीनीकरणबाबत राज्य बँकेने सर्व आवश्यक बाबी पूर्ण केल्या आहेत. आता आरबीआयच्या निर्णयावर रुपी बँकेचे विलीनीकरण अवलंबून आहे.
आर्थिक अनियमिततेमुळे फेब्रुवारी २०१३ मध्ये रुपी बँकेवर निर्बंध घातले आहेत. रुपी बँक शंभरी पार केलेली सहकार क्षेत्रातील महत्त्वाची बँक मानली जाते. पुणे, पिंपरी – चिंचवड, निगडी, ठाणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे बँकेच्या ३५ हून अधिक शाखा आहेत. निर्बंधामुळे गेल्या आठ वर्षांपासून सुमारे पाच लाख खातेदार आणि ठेवीदारांची तेराशे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत.
सहकार क्षेत्रातील महत्त्वाची बँक असल्याने राज्य सहकारी बँकेने रुपी बँकेच्या विलीनीकरणाची तयारी दर्शविली. आर्थिक पडताळणी अहवाल तयार केला. सहकार आयुक्तांमार्फत आरबीआयला प्रस्ताव पाठविला. आरबीआयच्या सूचनेनुसार राज्य बँकेने वार्षिक सर्वसाधारण सभेत रुपी बँकेच्या विलीनीकरणाचा ठराव केला. या ठरावाची माहिती १७ एप्रिल २०२१ रोजी आरबीआयला पाठविली आहे.
















