न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसें.) :- सामाजिक मूल्य जोपासत प्रशासकीय कामकाज करीत असताना, नागरिकांना उत्तम व तत्पर सेवा देणे म्हणजेच सुशासन आहे. “ई-गव्हर्नन्स’च्या माध्यमातून सुशासनापर्यंत अधिक पोहोचता येणे शक्य असून पिंपरी-चिंचवड महापालिका पुढील सहा महिन्यांच्या काळात “ई-गव्हर्नन्स’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप तसेच वैद्यकीय अधिकारी, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या वतीने अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म दिवस सुशासन दिवस म्हणून चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे साजरा करण्यात आला. त्यानिमित्त अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यशदाचे व्याख्याते विठ्ठल दिक्षित यांनी सार्वजनिक प्राधिकरणाकडून अधिकृत करण्यात आलेल्या सेवा, अधिसूचित करण्यात आलेल्या सेवा व सेवा हक्क नियम कालमर्यादेतील सेवा, द्यावयाची हमी, अपिलाच्या तरतुदी आणि अधिनियमांतर्गत येत असलेल्या शास्ती याबाबतची विस्तृत माहिती या कार्यशाळेत दिली.










