- लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लागू शकतो सहा महिन्यांचा अवधी..
- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२१) :- राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. “राज्यात मोफत लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारला २ कोटी व्हॅक्सिन विकत घ्यावे लागतील. त्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे”, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मात्र, त्यानंतर घुमजाव करीत त्यांनी राज्यात या वर्गासाठी १ मे पासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचं जाहीर केलं आहे. लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला असला, तरी येत्या ६ महिन्यात १८ ते ४४ या वयोगटातल्या सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची समिती सूक्ष्म नियोजन करत आहे, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
“१ मे ला राज्यात लसीकरण सुरू होणार नाही. आज लगेच आपल्याला लसीचे डोस उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरपर्यंत जर लसीचे डोस उपलब्ध होणार असतील, तर त्यांना अचानक एकाच वेळी लसीचे डोस देता येणार नाहीत. त्यामुळे तरुणांना माझं नम्र आवाहन आहे की आपण सगळ्यांना मोफत लसीकरण करतो आहोत. पण आता समजुतदारीने काम घ्यावं लागणार आहे. नोंदणीसाठी कोविन अॅप वापरणं सक्तीचं आहे. त्यामुळे आधी नोंदणी करूनच नोंदणी केंद्रावर जाता येणार आहे. कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये. केंद्र सरकारने नोंदणी बंधनकारक केली आहे”, असं यावेळी राजेश टोपे म्हणाले.
१८ ते २५, २५ ते ३५ आणि ३५ ते ४४ अशा वर्गवारीवर काम सुरू आहे. ३५ ते ४४ हा गट आधी घेता येईल का? याची चाचपणी सुरू आहे. यातले सहव्याधीचे रुग्ण आधी घेता येतील का? यावर देखील विचार सुरू आहे. १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र वेगळे असतील आणि ४५ वयोगटाच्या पुढचे केंद्र वेगळे असतील”, अशी देखील माहिती राजेश टोपे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.
















