- प्रशासनच्या निर्णयावर सदस्यांचा त्रागा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या मालकीची चार रुग्णालये टप्प्या टप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ऑक्सिजन हे कारण दिले जात असतानाच दोन जम्बो कोविड रुग्णालये सुरू केली जात आहे, हा प्रकार अंत्यंत चुकीचा असून करोनाच्या उपाय योजनांमध्ये विसंगती असल्याचा आरोप स्थायी समितीच्या सदस्यांनी केला. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. २८) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
करोनाच्या उपाययोजनांसंदर्भात स्थायी समितीच्या सदस्यांनी बैठकीत अनेक आक्षेप नोंदविले. यावेळी नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या जम्बो रुग्णालयांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच उपाय योजनांमध्ये असलेल्या विसंगतीबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या मालकीची चार रुग्णालये सध्या बांधून तयार आहेत. गतवर्षांपासून ही रुग्णालये तात्काळ सुरू करावीत, यासाठी लोकप्रतिनिधी आग्रह धरत आहेत मात्र, प्रशासनाकडून ती सुरू करण्यासाठी विलंब लावला जात आहे. त्यावरून सभेत जोरदार चर्चा झाली.
आकुर्डी, भोसरी, थेरगाव आणि पिंपरीतील जिजामाता ही चार रुग्णालये सध्या बांधून तयार आहेत. ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास करोनाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, ऑक्सीजनची कमतरता हे कारण देत टप्या-टप्याने ही रूग्णालये सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, सध्या शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने भोसरी आणि सांगवी येथे दोन जम्बो कोविड रुणालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी देखील ऑक्सिजनची गरज भासणार आहे. मग बांधून तयार असलेली चार रुग्णालये सुरू करण्यासाठी बिलंब आणि जम्बोसाठी आग्रह हा प्रकार चुकीचा असून कोरोनाच्या उपाय योजनांमध्ये विसंगती असल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केला.