- महापालिकेची पोलीस ठाण्यात धाव; आयुक्तांची कठोर कारवाईची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे. २०२१) :- ऑटो क्लस्टर येथील घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले जात नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली होती. अन्यथा आम्ही आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, अशा इशारा सदस्यांनी दिला होता. दरम्यान, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे पिंपरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी ऑटो क्लस्टरमध्ये रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. येथे मोफत उपचार केले जातात. वैद्यकीय सेवेसाठी ठेकेदारी पध्दतीने फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर या खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली. शुक्रवारी महापालिका सभेत ऑटो क्लस्टरमध्ये सेवा करणाऱ्या स्पर्श संस्थेबाबत नगरसेवकांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले.
कोरोनाग्रस्त रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये स्पर्श संस्थेत काम करणारे सल्लागार डॉ. प्रवीण जाधव यांनी वाल्हेकरवाडीतील ‘पद्मजा’ हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे, डॉ. सचिन कसबे यांच्यासह स्वीकारल्याचा आरोप सभेत करण्यात आला. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.