- शहरातील हॉस्पिटल व कोविड सेंटरला करणार ऑक्सिजन पुरवठा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मे. २०२१) :- पुणे शहर, पिंपरी – चिंचवड व चाकणसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी २० वाहनांद्वारे महिंद्रा समूहाकडून हॉस्पिटल व कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. पुढच्या टप्यात शंभर वाहने रस्त्यावर उतरवून घरोघरी मोफत सिलिंडर पोहचविण्यात येणार आहेत, अशी घोषणा कंपनीने केली आहे.
हॉस्पिटल आणि कोरोना केंद्रामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी महिंद्रा समूहाने ऑक्सिजन ऑन व्हील या उपक्रमाची घोषणा केली आहे. पुणे व पिंपरी – चिंचवडसह मुंबई , ठाणे , नाशिक आणि नागपूरमध्ये मोफत सेवा देणार आहे. रुग्णांच्या थेट घरी ऑक्सिजन सिलिंडर पोचविण्याचा विचार आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक प्रशासन आणि सरकारी संघटनांशी करार केला आहे. वाहनांचा ताफा, नियंत्रण केंद्र यांच्या मदतीने रुग्णालय आणि वैद्यकीय केंद्रांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल, ऑक्सिजनची तातडीची गरज पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. असे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा यांनी सांगितले.
उपकरणांचेही उत्पादन…
कोरोना रुग्णांसाठी आयसीयू बेड उपलब्ध करणे, आपत्कालीन केंब सेवा, विलगीकरण केंद्र उभारणे, वंचित घटकांना आर्थिक मदत आणि धान्यपुरवठा करणे, पीपीई किट, फेस मास्क अशा वस्तूंचे उत्पादन कंपनीतर्फे करण्यात येत आहे.