- रुग्णालय व्यवस्थापनाच रुग्णांकडे दुर्लक्ष; नातेवाईकांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मे. २०२१) :- जम्बो कोविड केअर सेंटरच्या अनागोंदी कारभारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांचे साहित्य चोरीला जाणे याबरोबरच आता रुग्णांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे रुग्णांना जीव गमवावा लागत आहे, असा आरोप नातेवाईकांकडून होत आहे. त्यामुळे जम्बो कोविड सेंटर नाही, ‘ डेड हाऊस आहे ‘ असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
शासकीय सुविधा परवडणारी असल्याने अनेकजण महापालिकेने दिलेल्या सेवेवर अवलंबून आहेत. मात्र, याठिकाणी रुग्णांकडे केले जाणारे दुर्लक्ष हेच रुग्णांच्या मृत्यूचे कारण बनत आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू येथील डॉक्टरांच्या दुर्लक्षितपणामुळे झाला आहे, असा आरोप होत आहे. या महिलेच्या पतीचे निधन झाले असून, दोन मुलींचा एकटी सांभाळ करत होती. आईचाही मृत्यू झाल्याने दोन्ही मुली
पोरक्या झाल्या आहेत. मृत महिला ही वाकड येथील असून १४ एप्रिल रोजी तिला जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. महिलेस इतका अशक्तपणा होता की तिला धरून न्यावे लागत होते. अशा परिस्थितीत तिच्या मदतीला नर्स किंवा इतर कोणी येत नव्हते.
सेंटरमध्ये रुग्ण दाखल केला की त्याकडे कोणी लक्ष नाही. त्यामुळे महिला दोन वेळा बेडवरून आणि स्वच्छतागृहात पडली. तेव्हा तिच्या डोक्याला मार लागला. अशा प्रकारे रुग्णांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रुग्ण बरे होण्याऐवजी मृत्युमुखी पडत आहेत.
याबाबत प्रशासकीय संचालक डॉ. संग्राम कपाले म्हणाले, सदर महिला आमच्याकडे आली, यावेळी तिचे फुफ्फुस ९० ते ९५ टक्के निकामी झाले होते. अशा रुग्णास वाचविणे कोणालाही अशक्य होते. आम्ही तिला वाचवण्याचा आमच्या परीने प्रयत्न केला.
सदर महिला ही गरीब असल्यामुळे तिला खासगी डॉक्टरने जम्बो सेंटरला जाण्याचा सल्ला दिला. तसेच तिला काय उपचार द्यायचे हे देखील लिहून दिले होते. मात्र सेंटरमध्ये गेल्यानंतर तिच्यावर चार दिवस उपचार केले नाहीत. याउलट तिचा एक व्हिडिओ काढून चांगले उपचार देतात असे सांगायला लावले. नागरिक विश्वासाने जम्बोमध्ये येतात, पण याठिकाणी दुर्लक्षामुळे जास्त मृत्यू होताहेत. बेजबाबदार डॉक्टरांनीच महिलेस मारले आहे.
– सुनील चोरडिया, महासचिव, हँडीकॅप सेंटर मोहननगर…

















