- उपमहापौर घुलेंचा विरोध; उपसूचना रद्दची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला होता. सहा वर्षांपासून बोपखेलवासियांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्याचा आणि रस्ता करण्याचा निर्णय घेतला. बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी पुल बांधण्याकरिता तरतूद ठेवण्यात आली.
महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून एन्ड. टी.इन्फ्रा या कंत्राटदाराला ५३ कोटी ५३ लाख ३७ हजार रुपयांमध्ये पुलाचे काम दिले. बोपखेलवासियांच्या खूप जिव्हाळ्याचा हा प्रश्न राहिला. उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. लवकरच काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीस खुला होईल अशी आशा नागरिकांना आहे. मात्र, ३० एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पुलाच्या कामासाठी असलेल्या १७ कोटी ८६ लाख ६३ हजार रुपयांमधून ५ कोटी रुपयांची तरतूद झोपडपट्यांमधील महिलांना चादर, कंबल, संसारपयोगी साहित्य देण्याच्या लेखाशिर्षावर वळविण्यात आली.
बोपखेलवासियांसाठी हा पूल एकमेव दळणवनाचे साधन आहे. तरतूद वळविल्याने पुलाच्या कामाला विलंब होऊ नये. नागरिकांना आणखी हाल, अपेष्टा सहन कराव्या लागतील. माझ्या नागरिकांकरिता असलेले पुलासाठीचे हक्काचे पैसे दुसरीकडे वकविण्यास माझा तीव्र विरोध आहे. पुलाच्या कामाचा एकही रुपया वळवून देणार नाही. पुलाचे काम वेळेत मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिका आयुक्तांनी दुसऱ्या कुठल्याही लेखाशिर्षातून तरतूद वर्ग करावी. पण, बोपखेल पुलाची करू नये. आगामी महापालिका सभेत इतिवृत्त मंजूर करताना बोपखेल पुलाची तरतूद वळविण्याची उपसूचना रद्द करावी.
– हिराबाई उर्फ नानी घुले, उपमहापौर पिं. चिं. मनपा…