- सिलिंडरसाठी निविदा प्रक्रिया राबवूनही ठेकेदारांची पाठ..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये सातत्याने करोनाबाधित रुग्ण वाढत आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढत असताना पालिका प्रशासनाला ऑक्सिजनसाठीचे मोकळे सिलिंडरही मिळेनासे झाले आहेत.
पालिका प्रशासनाने ५०० जम्बो सिलिंडरसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्याला एकाही ठेकेदाराचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाला दोनदा या निविदा प्रकियेला मुदतवाढ द्यावी लागली.
महापालिकेच्या वतीने शहरातील वाढत्या करोनाबाधित रुग्णांची सोय होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आकुर्डी व थेरगाव येथील नवीन रुग्णालयांमध्ये गैस पाइपलाइन टाकण्याचे काम अंतिम टप्यात आहे. या रुग्णालयांसाठी मोकळ्या जम्बो सिलिंडरची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन अल्प मुदतीची निविदा प्रक्रिया राबविली. मात्र त्यास एकाही ठेकेदाराचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी (दि. ५) याला एक दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र एकाही ठेकेदाराचा प्रतिसाद न मिळाल्याने दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे.


















