न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २६ डिसें.) :- वर्षभरापूर्वी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमामध्ये विजय दिवसाच्या निमित्तानं उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा सरकारनं ताकही फुंकुन पिण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळेच, कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ आणि आजूबाजूची जागा २२ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत राज्य सरकारच्या ताब्यात राहणार आहे. तसे आदेशच मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
१ जानेवारीच्या विजय दिवसाच्या नियोजनासाठी या जागेचा ताबा मिळावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावर ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान लोकांना अभिवादनास मान्यता दिली आहे. तर प्रशासनानं २२ डिसेंबरपासून विजय दिवसाची तयारीसाठी या जागेचा ताबा मिळवलाय आणि १२ जानेवारीला पुन्हा जागा २२ डिंसेबरला ज्या स्थितीत होती त्या स्थितीत जागा मालकाच्या ताब्यात द्यायची आहे.
जागा मालकाच्या पिकांचे नुकसान होणार नाही, अशी अट न्यायालयाने जागा सरकारच्या ताब्यात देताना घातली आहे. त्याचे पालन केले जाईल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
दरम्यान, येत्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी तसेच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यंदाही जवळपास १० लाख नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होतील, असा अंदाज आहे. त्यांच्यासाठी आवश्यक सोई-सुविधांचं नियोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी शासनाकडून दोन कोटी रुपये देण्यात येणार आहेत.










