न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- आजच्या तरुणांमध्ये अमर्याद क्षमता असून ती योग्य दिशेने वापरण्याची गरज आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी न जाता स्वतःची ताकद ओळखून ध्येय निश्चित केले तर यश निश्चित मिळू शकते, असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘उत्सव तरुणाईचा २०२६’या युवा मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, युवा कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात गोरखे यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे युवकांमध्ये एकाग्रता आणि आत्मविश्वास कमी होत असल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी सिंहाच्या पिल्लाचे उदाहरण देत संकटाच्या काळात माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होते, असे सांगितले. प्रत्येकाने आपल्या सुप्त गुणांची ओळख करून घेत आत्मविश्वास वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
युवकांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य द्यावे, नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार, योग आणि प्राणायामाचा अंगीकार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. शरीर आणि मन सुदृढ असेल तर कोणतेही आव्हान पेलणे शक्य होते, असे ते म्हणाले.
राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या युवकांनी सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा शिक्षण, नेतृत्वगुण, समाजकार्य आणि अभ्यासाला महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचा संदर्भ देत शिस्त, परिश्रम आणि सातत्य यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
“स्क्रीनवर स्मार्ट दिसण्यापेक्षा विचारांनी स्मार्ट व्हा. मोठी स्वप्ने पाहा, सकारात्मक विचार ठेवा आणि ध्येयासाठी सातत्याने मेहनत करा,” असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.















