- शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र राजेंद्र तरस यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी रेनकोट आणि गणवेशाचे वितरण करावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले असून, महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत दर्जेदार गणवेश आणि रेनकोट उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच महापालिकेने रेनकोट व गणवेश खरेदी, वितरण आणि वाटपाचे नियोजन तातडीने पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन महापालिका प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी व्यक्त केली आहे.















