- हिंदु – मुस्लिम समाजाने राममंदिर – मशिद वादाबाबत न्यायालय अथवा अध्यादेशावर अवलंबुन न राहता परस्पर सहमतीने, समन्वयाने मार्ग काढावा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसें.) :- भगवान प्रभु श्रीरामचंद़ांवर मनापासून माझी श्रध्दा आहे. माझे आई, वडीलासह माझ्या पुर्वज्यांची अशीच श्रध्दा होते व आहे. त्यामुळेच रामजन्मभूमी आंदोलनात मी तरुण वयात मनापासून सहभागी होतो. छत्रपती शिवाजी महाराज, भगवा ध्वज या प्रतिकामुळे शिवसेना या पक्षात सक़ीय होतो. स्व अटलबिहारी वाजपेयी, स्व. अशोक सिंघल, स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. प्रमोद महाजन, लालकृष्ण आडवानी, आचार्य धमेंद़ साध्वी रुतुबरा, साध्वी उमा भारती, विनय कटियार, प्रविण तोगडिया आदींच्या भाषणामुळे देशातील व महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले होते.
”सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनायगे, जो राम का नहीं, वह हमारे काम का नहीं.” ”जिस हिंदू का खुन ना खवले, वह खुन नही पाणी है”, अशा घोषणा देऊन प्रसार प्रचार सुरू होता. कारसेवा, विटा जमविणे, मंदिर उभारणीसाठी निधी संकलीत करणे हा कार्यक्रम संघ परिवार, विश्व हिंदु परिषदेच्या माध्यमातून देशभर सुरू होता. लोक अत्यंत श्रध्देने यात सहभाग नोंदवत होते. पहिल्या कारसेवत अयोध्येत कोठारी बंधु बाबरी मशिदीच्या घुमटावर चढले. मात्र, ते गोळ्या लागुन शहीद झाले.
भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढून देश ढवळून काढला. ही रथयात्रा बिहारमध्ये मुख्यमंत्री लालुप्रसाद यादवांनी अडवुन आडवानींना अटक केली. त्यामुळे देशात आगडोंब उसळला. त्यात अनेकांचे प्राण गेले. प्रचंड वित्त हानी झाली. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव असताना कारसेवा करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी शेकडो रामभक्तांचे प्राण गेले. पुढे संघ परिवाराने खुप तयारी करुन ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत कारसेवेचा कर्यक्रम आखला. त्यावेळी पंतप्रधान नरसिंह राव व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग होते. बाबरी मशिदीच्या ढाच्याला धक्का लागु देणार नाही, असे प्रतिज्ञापत्र मा सर्वोच्च न्यायालयात उ. प्र. सरकारने दिले होते. ५ डिसेंबर १९९२ ला अयोध्येत स्व. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवानी, अशोक सिंघल, साध्वी रुतुबरा, उमा भारती, विनय कटियार आदि नेत्यांनी अत्यंत भडकावु भाषणे केली.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली. त्यानंतर या घटनेबद्दल संघ परीवार भाजपाने हात वर करुन, तो मी नव्हेच… अशी भुमिका घेतली होती. त्यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशिद शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्याचा अभिमान वाटतो, असे जाहीर वक्तव्य केले होते. या घटनेचा लाभ घेत केवळ दोन खासदार असणाऱ्या भाजपने सन १९९५ ला २३ पक्षाचा टेकु घेत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वा खाली एन. डी. ए. चे सरकार अस्तित्वात आले. तर, महाराष्ट्रात शिवसेना भाजपाचे सरकार येऊन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार आले. या भाजपच्या सरकारने व शिवसेने प्रभु रामचंद्र या शब्दातील र चा देखील उच्चार केला नाही. खरे तर सरकारमध्ये असताना राममंदिर उभारणीसाठी भाजपा शिवसेनेने सत्तेची लालसा सोडून सरकार शहीद केले असते. तर, पुढच्या निवडणूकीत धो-धो मतांनी पुन्हा युती सरकार निवडून आले असते. मात्र, तसे झाले नाही. पुन्हा मतासाठी गणपती दुध पीतो, रामसेतुचे पाण्यावर तरंगणारे थरमाकोलचे दगड फिरवून भावनिक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न संघ परिवाराने केला. मात्र, भारतीय जनतेच्या लक्षात आले की, आमच्या धार्मिक भावनांना हात घालून मताचे गलिच्छ राजकारण संघ परिवार करतय. म्हणून फिल गुड, फिल गुड म्हणत निवडणूकीला सामोरी गेलेल्या भाजपाला जनतेने नाकारुन कांग़ेसचे मनमोहन सिंग सरकार निवडुन दिले. हे सरकार सलग दहा वर्ष चालले.
गैरव्यवहार व भ़ष्टाचार मुद्दे घेऊन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकपाल आंदोलन केले. त्याचा फायदा घेत भाजपा व संघ परिवाराने प्रसार प्रचार करुन देशात २८२ भाजपचे खासदार निवडून आणले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण बहुमताचे सरकार निवडून आले. या सरकारला शिवसेनेच्या १८ खासदारांनी पाठिंबा दिला. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भाजपाने आपला इंगा दाखवला. शिवसेने सोबतची युती तोडली. विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याचे मंत्री, मुख्यमंत्री नेते महाराष्ट्रात प्रचारात उतरले होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यानी त्यावेळी भाजपाच्या या नेत्यांना औरंगजेब, आदिलशाही, निजामशाही कुतुबशाही अशी तुलना केली होती. उत्तरेकडील या आक्रमणा पुढे महाराष्ट्राचा हा गढी एकटा पडतोय असे भावनिक वातावरण तयार होऊन, ऐवढी मोदी लाट असताना शिवसेनेला स्वबळावर ६३ आमदार निवडून दिले. सेनेचे ऐवढे आमदार बाळासाहेब ह्यात असतानाही निवडुन आले नव्हते. त्याच वेळी भाजपचे १२२ आमदार निवडून आले. भाजपाने पाठिंबा मागितलेला नसताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा जाहीर करुन गुगली टाकली.
शिवसेनेने अत्यंत स्वाभिमानी भुमिका घेत एकनाथ शिंदेना विरोधीपक्ष नेते जाहीर केले. हाऊसमध्ये राष्ट्रवादी च्या तटस्थ राहण्यावर हे फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र महाराष्ट्राच्या मातीला शोभणारी स्वभिमानी कणखर भुमिका घेणाऱ्या पक्षप़मुख उध्दव ठाकरेनी औरंगजेब, आदिलशाही कुतुबशाही निजामशाही समोर साष्टांग मुजरा केला. काही तुटकी फुटकी मंत्रीपद व महामंडळे यावर सेनेची बोळवण केली गेली. सेनेचा पावलो पावली अपमान केला. एकीकडे केंद्रात राज्यात मंत्रीपद लाभ घ्यायचा, कैबीनेट मधे विरोध करायचा नाही. बाहेर मात्र विरोध करायचा. प्रसंगी आमचे राजनामे खिशात आहेत. अशी सिंह गजंना करायची आणि त्याबाबत चतुर कोल्हाप्रमाणे जनतेला बनवणारे उत्तरे देऊन दिशाभुल करायची.जर सुरवातीला शिवसेने घेतलेली स्वाभिमानी भुमिका सोडली नसती आणि पाच वर्ष प्रभावी विरोधी पक्षाची भुमिका पार पाडली असती, तर आज महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेनेला एक हाती सत्ता दिली असती.
मात्र, केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारचा कार्यकाल जवळ जवळ संपत आलाय. यांना भगवान प्रभु श्री. रामाची आठवण झाली नाही. अगदी निवडणुकीच्या तोंडावर उध्दव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली. भाजपाने आपला राजकारणातील प्रमुख मुद्दा हायजाक होतोय की काय या भीती पोटीच संघ परीवार व भाजपानेही रामनामाचा जप सुरु केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ वर्ष युतीत आम्ही सडलोय, या पुढे कोणाशीही युती नाही. शिवसेना स्वबळावरच लढणार, अशी जाहीर घोषणा केली. त्यामुळे पुन्हा युती करायची असेल, तर रस्ता खुला व्हावा यासाठी अत्यंत नियोजनबध्द नरेंद़ मोदी, देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरे यांनी राममंदिर जनतेचा भावनिक मुद्दा पुढे करुन हिदूत्व मुद्दयावर पुन्हा युती करण्याचा रस्ता प्रशस्त करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
भगवान प्रभु श्रीराम, शरयु, अयोध्येपर्यंत असणारा मुद्दा आता भोळ्या, भाभड्या, वारकऱ्याचा देव असणाऱ्या पंढरीचा पांडुरंग परमात्मा व पवित्र चंद़भागेपर्यंत चालला आहे. आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जनतेच्या धार्मिक भावनाना हात घालून भाजपा, शिवसेना, काग़ेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, एमआय एम, बहुजन वंचित आघाडी किंवा कुठल्याच राजकीय पक्षांनी करु नये. रामजन्मभूमी वाद न्यायालयात प्रलंबित असताना ६ डिसेंबर १९९२ बाबरी मशिद पाडली गेली. ही त्या आंदोलनकर्त्याकडून मोठी चुक झाली होती. म्हणून हिंदु समाजाकडून त्या आंदोलन कर्त्याकडून झालेल्या चुकीबद्दल भारतीय मुस्लिम बांधवांची जाहिर माफी मागुन, ती वादग्रस्त जागा मंदिर उभारण्यासाठी द्यावी, अशी विनंती मुस्लिम बाधवांना करावी. रामजन्मभूमीची वादग्रस्त जागा मुस्लिम बाधवांनी मोठे मन करुन मंदिर उभारणीसाठी हिदुना द्यावी. हिदु समाजाने मोठे मन करुन, मुस्लिम बांधवांसाठी मंदिराऐवढेच मोठे भव्य दिव्य प्रथानास्थळ मशीद उभारुन देण्याचे अभिवचन मुस्लीम बांधवांना द्यावे.
हिंदु समाजाचे भगवान श्री. रामचंद्र प्रभुबाबत कोट्यवधी हिंदूंच्या भावना खूपच तीव्र आहेत. अयोध्येतील ती वादग्रस्त जागा श्रीराम प्रभुचे जन्मस्थानथ आहे, अशी हिंदु समाज्याची भावना आहे. त्यामुळे हिंदु, मुस्लिम समाज्यातील धुरींनींनी एकत्रित येऊन आगलावे नेते, पुढाऱ्यांना बाजुला सारुन हा प्रश्न सोडवला पाहिजे. दोन्ही बाजुच्या भावनांचा आदर करीत न्यायालय किंवा अध्यादेश काढुन हा प्रश्न न सोडवता,हिंदु, मुस्लिम समाजाने एकमेकांच्या भाव-भावनांचा आदर करुन समन्वयाने मार्ग काढावा. म्हणजे या मुद्द्यावर वर्षानुवर्षे राजकरण करणाऱ्या डोमकावळ्याचे मनसुबे उधळले जाऊन, संपूर्ण भारतीयांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेतकरी, कामगार, युवक युवतीचे मुलप्रश्नावर काम होऊन, एकमेकात निर्माण झालेला दुरावा नष्ट होऊन, १२५ कोटी भारतीयांनी हातात-हात धरुन विकासाच्याच राजकारणाला पाठिंबा देऊन, बलशाली भारत घडवू शकतील.
लेखक – मारुती भापकर (माजी नगरसेवक)













