- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मे. २०२१) :- मुस्लीम धर्मीयांचा पवित्र सण रमजान ईदच्या अनुषंगाने गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यावर्षी १३ एप्रिलपासून मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला.१३ किंवा १४ मे २०२१ (चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी रमजान ईद (इद उल फित्र) साजरी केली जाणार आहे.
त्यानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदसाठी मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करुन ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करणे उचित ठरेल. नमाज पठणासाठी मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.
रमजान ईद निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळे व्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात कलम १४४ लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत, तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये.
रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोव्हिड १९ च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेही अनुपालन करावे. रमजान ईदच्या निमित्ताने गृह विभागामार्फत या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
















