- सभागृह बंद; सर्वसाधारण सभा होणार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मे. २०२१) :- कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे पिंपरी – चिंचवड महापालिका भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृह बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मे महिन्यातील सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.२०) महापौर कक्षातून ऑनलाइन होणार आहे. या सभेसाठी पदाधिकारी, गटनेत्यांनी त्यांच्या कॅबिनमधून तर, नगरसेवकांनी क्षेत्रीय कार्यालय किंवा आपल्या घरुन ‘ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेत सहभागी व्हावे, अशा सूचना दिल्या आहेत.
संसर्ग काळात सभागृहात होणारा गोंधळ व वायफळ चर्चेला लगाम लावावा म्हणून महापौरांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यातील सर्व महापालिकांच्या सर्वसाधारण सभा, विषय समिती सभा ऑनलाइन घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. महापालिका अधिनियमानुसार तीन महिन्यात सर्वसाधारण सभा न झाल्यास नगरसेवक पद रद्दची तरतूद आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यात येत आहेत. यापूर्वी महापौर, आयुक्त, नगरसचिव, पदाधिकारी व गटनेते सभागृहातून तर, उर्वरित नगरसेवक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या घरुन सभेत सहभागी होत होते.
राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी आहे. याकरिता पालिका भवनातील यशवंतराव सभागृह बंद ठेवून महापौर आपल्या दालनातून सभा ऑनलाइन घेणार आहेत. तर, पदाधिकारी आपल्या दालनात बसून ऑनलाइन सहभागी होणार आहेत.
















