न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. मे. २०२१) :- चिखली पोलीस ठाणे व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने चिखली पोलीस ठाण्यामध्ये “एस पी ओ गणवेश” वाटप ह्या छोटेखानी पोलीस मित्रांच्या कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी उपमहापौर, नगरसेवक केशव घोळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, एल.आय.बी.चे भास्कर ताराळकर, दिनेश ढवळे, सदाशिव शिंदे, रघुनाथ सावंत, समिती अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, विभागीय मुख्य संघटक सतिश देशमुख उपस्थित होते.
या प्रसंगी माजी उपमहापौर केशव घोळवे म्हणाले,” चिखली पोलीस ठाण्याचा हद्दीचा परिसर बराच मोठा आहे. परंतु एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर मधील रहिवाश्यांना सदरचे एम आय डी सी पोलीस ठाणे फार दूरचे ठरते, तक्रार दाखल करण्यास मोठा विलंब होतो, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षा हेतू सदर परिसर चिखली पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करणे आवश्यक ठरते या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी.तसाच काहीसा प्रकार त्रिवेणीनगर, निगडी हद्दीतील रहिवाशयांबाबत होत आहे. याकरिता देहूरोड, निगडी, चिखली व एम आय डी सी या चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीचे पुनरसर्वेक्षण व्हावे, म्हणजे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. संचारबंदीच्या काळात तसेच अनेक वर्षांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे सुरक्षा स्वयंसेवक पोलीस मित्र हे पोलीस विभागास सहकार्य करताना मी पाहतो आहे. गुणवंत कामगार, उच्चशिक्षित तरुण लॉकडाऊनच्या कठीण काळात पोलिस विभागास सुरक्षा हेतू मदत करतात हे नक्कीच अभिनंदनीय आहे.”
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले,” गेल्या वर्षभरापासून पोलीस मित्रांचे ग्राऊंड वर्क मी व्यक्तिशः पाहत आहे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे एस पी ओ, हे त्यांची खाजगी कंपनीतील ड्युटी सांभाळून पुन्हा पोलिंसाना मदत हेतू बंदोबस्त करण्याकरिता दिवसा व रात्री असे नित्यनियमाने कार्यरत आहेत हे नक्कीच कौतुकास्पद आहे. ३० वर्षाच्या पोलीस विभागाच्या कारकीर्तित प्रथतः आपल्या शहरात पोलीस मित्र अतिशय तन्मयतेने काम करताना मला दिसून आले. नाहीतर बऱ्याच वेळा पोलीस मित्र ही संकल्पना फक्त कागदावरच राबवलेली दिसून येते.मात्र शहरात ह्या साध्या वेशातील विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे काम नक्कीच उल्लेखनीय आहे.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” समितीचे एस.पी.ओ हे २० वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पोलिस विभागास सहकार्य करीत आहेत. चिखली परिसरातील नगरसेवक केशव घोळवे यांच्या प्रयत्नातून पोलीस मित्रांना एस.पी.ओ गणवेशाचे वाटप आज संपन्न झाले.त्यांची मदत ही नेहमीच संस्थेस होत असते.पोलीस ठाण्यातून मिळालेल्या गणवेश व टोपी मुळे पोलीस मित्रांना हिरारीने चौक परिसरात बंदोबस्त करीता काम करता येते.सध्या आपल्या शहरावर कोरोना महामारी चे संकट आलेले आहे. अश्या कठीण काळात 2 लाखापेक्षा जास्त नागरिक कोविड संक्रमित झाले आहेत, अनेक पोलीस कर्मचारी सुद्धा ह्या विषाणूने बळी पडले आहेत.अश्या फ्रंट लाईन योद्ध्यासंमवेत संचारबंदीमध्ये समितीचे एस पी ओ खांद्याला खांदा लावून मदत करत आहेत.”
समितीचे एसपीओ राजेंद्र येळवंडे,लक्ष्मण इंगवले,सतिश देशमूख,शशिकांत इंगळे,सुरेश गावडे,राजेश हजारे,उद्धव कुंभार,सुनिल चौगुले,संजय महाजन,प्रकाश पानस्कर,महेश काकडे त्याचप्रमाणे कै. तुकाराम तनपुरे फौंडेशन चे अशोक तनपुरे यांना “एसपीओ गणवेश”उपस्थित पाहुण्यांच्या वतीने देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजू येळवंडे यांनी केले आभार प्रदर्शन राजेश हजारे यांनी केले.