- वॉर रुममधून मोबाईलद्वारे कोरोनामुक्त रुग्णांची आजाराबाबत विचारपूस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरामध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना म्युकर मायकोसिसचे रुग्ण आवळून येत आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना हा आजार होत असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यांना पालिकेच्या वॉररूमधून मोबाईलद्वारे संपर्क साधून म्युकर मायकोसिसच्याची लक्षणे आढळताच प्राथमिक अवस्थेत त्यावर उपचार केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने यंत्रणा सज्ज असल्याचा दावा सोमवारी (दि.१८) केला आहे. या आजारासंदर्भात आढावा बैठक झाली.
बैठकीस महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, डॉ. अनिकेत लाठी आदी उपस्थित होते. त्यात वरील दावा करण्यात आला.
सध्या वायसीएम रुग्णालयामध्ये म्युकर मायकोसिसच्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यातील काही रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, त्यामुळे उपचाराअभावी रुग्णाचा चेहरा, नाक डोळ्याचा भाग, मेंदू यावर परिणाम होऊ शकतो. या बुरशीचा संसर्ग वाढल्यास दृष्टी जाऊ शकते. बुरशीचा संसर्ग फुप्फुसापर्यंत जाऊन प्रसंगी रुग्णाचा मृत्यु देखील होऊ शकतो. हा आजार शक्यतो कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये आढळून येतो. यासाठी रुग्णालयांत बरे होऊन घरी गेलेल्या रूग्णांची पालिकेच्या वॉर रुममधून मोबाईलद्वारे विचारपूस केली जाणार आहे.
चौकशीत ज्या रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिसची लक्षणे आढळून येतील त्यांना त्वरीत उपचार घेण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. यामुळे म्युकर मायकोसिसच्या संभाव्य रुग्णांना वेळीच व अगोदर आजाराची माहिती होऊन प्राथमिक स्तरावरच उपचार घेणे शक्य होणार आहे. रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. याप्रमाणे कामकाज करण्यासाठी वॉररुममधील यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना तातडीने उपचार द्यावेत. त्याचा शोध घ्यावा, असा सूचना महापौर ढोरे यांनी प्रशासनाला दिल्या.