- गमबूट, मास्क, हातमोजे, अवजारे कर्मचाऱ्यांना पुरवा – अॅड. चरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. मे. २०२१) :- आरोग्य कर्मचा-यांमार्फत पावसाळापुर्व नालेसफाईची कामे महापालिकेने हाती घेतली आहेत. तथापि, आरोग्य कर्मचा-यांना कोणतीही सुरक्षासाधने पुरविली जात नाही. कोरोना महामारीत महापालिका आरोग्य कर्मचा-यांच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने ही कामे थांबवून आरोग्य कर्मचा-यांना सुरक्षा साधने पुरवावीत, नालेसफाईसाठी यांत्रिकी पद्धतीचा अवलंब करावा, अशी सुचना जिल्हा दक्षता समितीचे सदस्य अॅड. सागर चरण यांनी केली आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबतचे लेखी पत्र देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापुर्वी नालेसफाईची कामे हाती घेण्याचा सोपस्कार पुर्ण केला जातो. आरोग्य कर्मचा-यांना गमबूट, मास्क, हातमोजे, अवजारे पुरविणे बंधनकारक आहे. मात्र, नाला – गटारे आणि मलनिःसारण वाहिन्यांची स्वच्छता करताना आवश्यक हातमोजे, गम बूट आणि इतर साहित्य देखील वेळेत मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
आरोग्य क्षेत्रात कार्यरत प्रत्येक कर्मचा-याला मुलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी कायदेशीर तरतूद ’हाताने मैला साफ कार्य करण्यास प्रतिबंध आणि सफाई कामगारांचे पुनर्वसन अधिनियम २०१३’ मध्ये आहे. मात्र, दरवर्षी पिंपरी – चिंचवड महापालिका या कायद्याचे उल्लंघन करते. सर्वोच्च न्यायालयाने देखील सफाई कामगारांना ६४ प्रकाराचे साहित्य पुरविण्याचे आदेश दिले आहेत. यंदाही नालेसफाई करताना ठिकठिकाणी आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असल्याचे विदारक चित्र आहे. सुरक्षासाधनांविना होत असलेल्या साफसफाई प्रकरणी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकडे दाद मागण्याचा इशारा अॅड. सागर चरण यांनी दिला आहे.


















