- १५ जून पूर्वी मिळकतकर भरा; पालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मिळकतीची करसंकलन विभागामार्फत कर आकारणी करून मिळकतकर वसूल करण्यात येतो. हा मिळकतकर रोख धनादेश डी.डी, आर.टी.जी.एस, एन.एफ.टी, यु.पी.आय, ई.डी.सी.इ. पद्धतीने स्विकारण्यात येतो. बहुतांशी मिळकत धारकांनी धनादेशाद्वारे मिळकतकर पालिकेकडे जमा केला होता. मात्र, हे धनादेश परत आल्याने पालिकेच्या कर संकलन कार्यालयाने फौजदारीचा इशारा दिला आहे.
करआकारणी व करसंकलन विभागामार्फत सन २०२०-२०२१ चे अंदाजपत्रकीय मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट ८७० कोटी ठरवून दिलेले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या कालावधीत विविध सवलत योजनासह वसुलीची मोहीम राबविण्यात आलेली होती. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात मिळकत धारकांकडे वसुलीकामी जप्तीची मोहीम राबविण्यात आल्याने जप्तीपूर्वी व जप्तीनंतर बरेच मिळकत धारकांनी कार्यालयास धनादेशाद्वारे मिळकतकर भरलेला आहे. परंतु, तदनंतर भरलेले धनादेश मोठ्या प्रमाणात अनादर झालेले आहे. त्यामुळे मिळकत धारकांकडे मिळकतकराची थकबाकी जास्त प्रमाणात आहे.
ही रक्कम महानगरपालिकेकडे येणे प्रलंबित आहे. अशा सर्व मिळकतधारकांकडे या अनादर धनादेशांची रक्कम भरणेकामी या कार्यालयाकडून नोटीस बजावली असून पाठपुरावा करणेत येत आहेत. तरी देखील मिळकतधारक धनादेशाची रक्कम महानगरपालिकेमध्ये भरणा करत नाहीत. ज्या मिळकतधारकांचे धनादेश अनादर झालेले आहेत अशा अनादर धनादेशाची संपूर्ण रक्कम करसंकलन विभागीय कार्यालयात दि. १५/०६/२०२१ पूर्वी भरावी, अन्यथा अनादर झालेल्या धनादेशांबाबत फौजदारी गुन्हासारख्या कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा पालिकेच्या करसंकलन विभागाने दिला आहे.


















