- कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. मे. २०२१) :- राज्यातल्या करोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण संपूर्णपणे बंद कऱण्याचे आदेश दिल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. म्युकरमायकोसिस आणि करोना या दोन आजारांसंदर्भातल्या आज झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, “जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत त्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण १०० टक्के बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्व बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातल्या कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.”
राज्यात सध्या सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, बीड, रायगड, पुणे, हिंगोली, अकोला, अमरावती, कोल्हापूर, ठाणे, सांगली, गडचिरोली, वर्धा, नाशिक, अहमदनगर, लातूर हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.

















