- भाजपला माहिती पुरवणाऱ्या प्रशाकीय यंत्रणेला धारेवर धरणार – संजोग वाघेरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोनाबाधित व बरे झालेल्या रुग्णांची माहिती वापरून सत्ताधाऱ्यांकडून त्याचा दुरुपयोग केला जात आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बाधितांशी संपर्क साधला जात आहे, असा आरोप करीत ती गोपनीय माहिती बाहेर जाते कशी, असा प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना भाजप यंत्रणेकडून संपर्क साधला जात आहे, ही बाब गंभीर आहे. कोरोना रुग्णांची माहिती उघड करण्यास बंदी आहे.
तरीदेखील ही माहिती प्रशासनाकडून बाहेर गेली. माहिती भाजप यंत्रणेपर्यंत कशी पोहोचली ही माहिती कोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवली, या प्रश्नांची उत्तर आयुक्तांनी द्यावीत अन्यथा राष्ट्रवादीकडून आंदोलन केले जाईल.


















