- ठेकेदाराचे पालिकेकडे बोट; दोन दिवसात पगार देण्याचा वायदा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२१) :- महापालिकेच्या नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरचे संचलन करणाऱ्या खासगी संस्थेने दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन केले. महापालिकेला बिले अदा केली आहेत. त्यामुळे वेतन थकल्याचे स्पष्टीकरण खासगी ठेकेदाराने दिले आहे. यावर बिल प्रकरणाची चौकशी करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी वैद्यकीय विभागास दिले आहेत.
नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे पीएमआरडीएच्या वतीने ८१६ बेडचे जम्बो हॉस्पिटल उभारले आहे. सध्या या सेंटरमध्ये, ऑक्सिजन व्हेंटिलेटरचे असे आठशे बेड आहेत. महापालिकेने हे रुग्णालय मेडब्रोज या खासगी संस्थेला दिले होते. जम्बो सेंटरमध्ये सुमारे सहाशे कर्मचारी काम करतात. त्यात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व साफसफाई कर्मचा-यांचा समावेश आहे. त्याचे वेतन महापालिका ठेकेदारामार्फत देते. मात्र, रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे संताप अनावर झालेल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून उद्रेक व्यक्त केला.
शुक्रवारपर्यंत वेतन मिळेल..
बिले महापालिकेला ५ तारखेला दिली आहेत. त्यांची प्रक्रिया चालू आहे. त्याला विलंब होत असल्याने अडचण निर्माण झाली. आम्ही पैसे उपलब्ध करुन वॉर्डबॉय, साफसफाई कर्मचा-यांचे वेतन दिले. मात्र, नर्स, डॉक्टर, सिनियर कन्सलटंनट यांच्या वेतनाचे आकडे मोठे आहेत. त्यामुळे बिल मिळेपर्यंत ते देणे शक्य होत नाही. शुक्रवारपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाईल, असे मेड ब्रोजचे डॉ. संग्राम कपाले यांनी सांगितले.
बिल जमाच नाही : विकास ढाकणे
जम्बोतील काही कर्मचा-यांनी वेतन मिळाले नसल्याने रोष व्यक्त केला. मात्र, वैद्यकीय सुविधेवर त्याचा परिणाम झाला नाही. ठेकेदाराने बिल जमा केले नाही. दोन दिवसांत तातडीने पैसे अदा केले जातील. दोन दिवसांत त्यांचा पगार होईल, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी संगितले.

















