- पालिका म्हणतेय, खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवरील रुग्णांना अर्धे बिल माफ..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२१) :- खरेदी केलेले तसेच सीएसआरमधून प्राप्त झालेले ४८ व्हेंटिलेटर पिंपरी चिंचवड महापालिकेने नियमबाह्यपणे शहरातील १० खासगी रुग्णालयांना दिल्याची चर्चा आहे. पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर बसवून जे उरले ते खासगी रुग्णालयांना दिल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्या व्हेंटिलेटरवर उपचार दिलेल्या रुग्णांना अर्धे बिल माफ करण्याच्या सूचना पालिकेने संबंधित खासगी रुग्णालयांना दिल्याचे सांगत सारवासारव केली जात आहे.
पालिकेने स्वतः व्हेंटिलेटर खरेदी केले. तसेच, सीएसआरच्या माध्यमातून खासगी कंपन्यांकडून पालिकेस व्हेंटिलटर भेट मिळाले. त्याची एकूण संख्या १४० झाली होती. पालिकेने त्यापैकी ४८ व्हेंटिलेटर शहरातील १० रुग्णालयांना दिले. त्यात पिंपरीतील वैद्यकीय महाविद्यालय, निगडी व चिंचवडचे रुग्णालय, आकुर्डीचे स्टार, स्टर्लिंग, थेरगावचे आदित्य बिर्ला, चिंचवडचे निरामय, भोसरीचे अकार्ड, ब्रम्हचैतन्य आणि रावेतचे ओजस यांचा समावेश आहे.
प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. खरेदी केलेले व सीएसआर अंतर्गत मिळालेले व्हेंटिलेटर प्राधान्याने पालिका रुणालयात बसविण्यात आले. तसेच, ऑटो क्लस्टर व नेहरूनगरच्या जम्बोमध्ये व्हेंटिलेटर बसविण्यात आले. उर्वरित ४८ व्हेंटिलेटर अतिरिक्त झाले. ते रुग्णांची वाढती संख्या आणि तातडीची गरज म्हणून खासगी रुग्णालयांना वितरीत करण्यात आले.
आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेचे पदाधिकारी व गटनेत्यांना त्यासंदर्भात माहिती दिली होती. पालिकेने व्हेंटिलेटर दिलेल्या रुग्णालयात व्हेंटिलेटरवरील रुग्णाकडून अर्धे बिल घेण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत, असे पालिकेचे अधिकारी सांगत असले तरी संबंधित रुग्णालय बिलात सवलत देते किंवा नाही, हे कळू शकलेले नाही.


















