- तिसऱ्या लाटेसाठी सज्ज; ४६५ चौरस मीटर क्षेत्र ताब्यात घेण्याची तयारी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२१) :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता पडली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून ऑक्सिजनची वाढती गरज पाहता महापालिकेच्या वतीने भोसरी येथील नवीन रुग्णालयाजवळ ऑक्सिजन प्लांट उभारणार आहे. त्यासाठी मोकळ्या निवासी विभागातील ४६५ चौरस मीटर क्षेत्र ताब्यात घेण्यात येणार आहे.
पिंपरी – चिंचवड शहरामध्ये सध्या दररोज सहाशेपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजनचा जाणवणारा तुटवडा लक्षात घेऊन महापालिकेने भोसरी येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन केले आहे. भोसरी येथील नवीन रुग्णालयाचा पूर्वेकडील बाजूस असलेली सर्वे क्रमांक १/३ पैकी ३० लांबीचा आणि १५.५० मीटर २४ मीटर रुंद रस्त्याला लागून असलेल्या मोकळ्या निवासी विभागातील ४६५ चौरस मीटर क्षेत्र महापालिकेच्या विकास योजनेत निवासी विभागात सामाविष्ट आहे.
मोकळया निवासी विभागातील ४६५ चौरस मीटर क्षेत्र ऑक्सिजन प्लांटसाठी खासगी वाटाघाटीने ताब्यात घेण्यास आणि ताब्यात येणाऱ्या क्षेत्राचा मोबदला (३० टक्के दिलासा रकमेसह) संबंधित नागरिकांना दिला जाणार आहे. त्यासाठी १३ हजार ३०० प्रति चौरस मीटर या दराप्रमाणे ८० लाख ३९ हजार ८५० रुपये इतके मूल्यांकन केले जाणार आहे.

















