- निगडी पोलिसांची थेट रत्नागिरी गाठत अटकेची कारवाई..
- आमदार आण्णा बनसोडेंना हादरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२१) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेवर रत्नागिरीत अटकेची कारवाई करत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. निगडी पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली.
सिद्धार्थ बनसोडेसह सतीश लांडगे, सावनकुमार सलादल्लू, रोहित पंद्री अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन जीवघेणे हल्ले केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर १२ मे रोजी गोळीबार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या तानाजी पवार याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, काही तासांनी तानाजी पवार याने अण्णा बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेसह २१ जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली होती.
दोन जीवघेण्या हल्ल्यांप्रकरणी फरार सिद्धार्थ बनसोडे रत्नागिरीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांची दोन पथकं त्या ठिकाणी गेली. तिथे सापळा रचून सिद्धार्थसह इतरांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आत्तापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.