- राज्याच्या जलसंपदा विभागाचे महापालिकेला आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड हद्दीतील पवना व इंद्रायणी नद्यांच्या पात्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि पूररेषांमध्ये टाकण्यात आलेला राडारोडा, मुरूम, माती तातडीने हटविण्यात यावी, असे आदेश राज्याच्या जलसंपदा विभागाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला दिले आहेत.
इंद्रायणी, पवना नद्यांच्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे झालेली आहेत. नद्यांच्या पूर वहनास कोणताही अडथळा येऊ नये यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
नद्यांची निळी आणि लाल पूररेषा आखणीचे नकाशे जलसंपदा विभागाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला देण्यात आले आहेत. कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून योग्य त्या उपयायोजना कराव्यात, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.