- रांगेत उभे राहूनही नागरिक लसी अभावी असुरक्षित..
- नगरसेवक शैलेश मोरेंकडून ‘एक नगरसेवक एक लसीकरण केंद्राची’ मागणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या अठ्ठावीस लाखांपेक्षा अधिक आहे. त्या तुलनेत शहरातील कोविड लसीकरण केंद्रांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे शहरातील निवडक लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी होतेय. पालिकेच्या लसीकरण केंद्रांकडे नागरिकांचा कल आहे. मात्र अपुऱ्या लशींमुळे नागरिक खासगी रुग्णालयांकडे वळत आहेत. इथे त्यांना मोफत असणाऱ्या लसीसाठी तिथे मोठी किंमत मोजावी लागत आहे.
या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेने पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर शहरात ‘एक नगरसेवक एक लसीकरण केंद्र’ सुरू करावे, अशी मागणी भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात सध्या कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी, भविष्यात रुग्णसंख्या वाढू शकते. त्यासाठी कोविड लसीकरण गरजेचे आहे. मात्र, दररोज पालिकेला मिळणार लसींचा साठा मर्यादित आहे. त्यातच विविध आस्थापना व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेगळी लसीकरणाची सोय नसल्याने या कर्मचाऱ्यांची देखील लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. नियोजनात सावळागोंधळ असल्यामुळे सर्वांपर्यंत लस पोहोचत नाही. १८ ते ४४ वयोगटासाठी देखील भविष्यात लसीकरण होणार आहे. त्याचा ताण पालिकेच्या यंत्रणांवर पडून यंत्रणा प्रसंगी कोलमडू शकते.
त्यासाठी पुणे पालिकेच्या धर्तीवर शहरात प्रभागनिहाय ‘एक नगरसेवक एक लसीकरण केंद्र’ सुरू करावे. एकाच वेळी प्रभागात चार ठिकाणी लसीकरण होईल. नगरसेवकांचा चांगला जनसंपर्क असल्यामुळे महत्वाच्या व्यक्तीपर्यंत लस पोहोचविणे सुकर होईल. लसीकरणाबाबतचा सावळागोंधळ दूर होईल व लसीकरण केंद्रावर होणारी गर्दीही कमी होईल, असे या निवेदनात नगरसेवक मोरे यांनी म्हटले आहे.


















