- लोखंडी भंगार विकून पालिका कमवणार नफा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे. २०२१) :- महापालिकेच्या सर्व ६ क्षेत्रीय कार्यालयांच्या पथकामार्फत शहरातील अनधिकृत व धोकादायक जाहिरात होर्डिंग्जचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर त्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पालिकेचे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उत्पन्न वाढण्यास सहाय्य होणार आहे, असा दावा पालिकेने केला आहे.
शहरात एकूण १ हजार ९८३ अधिकृत होर्डिंग्ज आहेत. त्या माध्यमातू पालिकेस गेल्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण ४ कोटी ५७ लाख आणि त्यांच्या मागील वर्षी सन २०१९ -२० मध्ये ६ कोटी २५ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. लॉकडाऊन व कोरोना संसर्गामुळे उत्पन्नात घट झाल्याने पालिकेने अनधिकृत होर्डिंग्जसाठी सर्वेक्षण मोहिम हाती घेतली आहे.
आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत हे सर्वेक्षण न करता सर्व ६ क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकामार्फत ते केले जाणार आहे. लोखंडी सांगाडा भंगारात विकून ८० टक्के रक्कम पालिकेस व २० टक्के रक्कम संबंधित एजन्सीला मिळणार आहे. लोखंडी भंगारचा किलोचा दर २१ रूपये निचित करण्यात आला आहे. सर्वेक्षण, होर्डिंग्ज तोडणे, वाहतुक, मनुष्यबळ आदी कामांचा खर्च संबंधित एजन्सी करणार आहे. दरम्यान, सर्व जाहिरात एजन्सीना पालिकेतर्फे पत्र पाठविण्यात आले आहेत. अनधिकृत होर्डिग्ज असल्यास त्याचे स्ट्रक्चर ऑडिट केले असल्यास ते होर्डिंग्ज अधिकृत करण्याबाबत पालिका विचार करणार आहे.