- महिना उलटला तरीही कारवाईची प्रतीक्षाच?
- बोर्डाच्या दुहेरी भूमिकेमुळे कर्मचारी भयग्रस्त, तर जनता संभ्रमात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२१) :- देहूरोड कॅंटोन्मेंटच्या बोर्डाच्या अतिक्रमण विरोधी पथकाला काही बेकायदेशीर बांधकामधारकांनी अर्वाच्य शिवीगाळ व धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली. ही घटना ३० एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२.१५ च्या दरम्यान घडली होती. त्याबाबत देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने देहूरोड पोलीस चौकीत रीतसर तक्रार दाखल केली होती. ही घटना घडून एक महिन्याचा कालावधी उलटला. तरीही त्या संबधितांवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे बोर्डाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
देहूरोड बोर्डाच्या हद्दीत आंबेडकरनगर व शिवाजीनगर परिसरात काही ठिकाणी सरकारी जागेवर बांधकाम सुरू असताना कॅंटोन्मेंटचे इंजिनिअर व सोबत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या ठिकाणी बांधकाम करू नका, असे आवाहन करीत होते. त्या बांधकामावर अतिक्रमण विरोधी कारवाई करीत असताना अचानक तेथे लोकांचा जमाव जमा झाला. त्यातील काहींनी कारवाईमध्ये अडथळा आणला. तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्याना अर्वाच्य शिवीगाळ व धक्काबुक्की केली. कर्मचारी कारवाई बंद करून तिथून निघून जात असताना त्यांनी त्यामध्ये अडथळे आणले व मज्जाव केला व सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे बोर्डाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मुळात महिना उलटला तरीही बोर्डाकडून त्या संबंधितावर कारवाई झाल्याची माहिती मिळत नाही. कारवाईसाठी पाठपुरावा होतो की नाही याचाही उलगडा नाही. आपल्याच कर्मचा-यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागायला बोर्डाला महिन्याभराचा विलंब होतो. त्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना बोर्डाकडून पाठीशी घातले जाते की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, दुसरीकडे बोर्डाच्या रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे एकाचा मृत्यू झाला. प्रशासनाला नातेवाईकांनी जाब विचारला म्हणून त्यांच्यावर तत्परतेने गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले. त्यात तरुण मुलांचा समावेश होता. त्यामुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. देहूरोड कॅंटोन्मेंटच्या बोर्डाच्या अशा दुहेरी भूमिकेमुळे एकीकडे बोर्डाचे कर्मचारी भयग्रस्त आहेत तर जनता संभ्रमात आहे.