- सावकारी कायद्यानुसार तिघांच्या विरोधात गुन्हा; एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जून. २०२१) :- वेळेवर व्याज न दिल्याने जबरदस्तीने चारचाकी वाहन घेऊन गेले. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. पिंपळे सौदागर येथे फेब्रुवारी २०१९ ते मे २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
शुभम अलोक अगरवाल (वय २१, रा. खडकी बाजार, पुणे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह राहुल रवींद्र जुनवणे (वय ४०, रा. औंध), नीतेश अरुण उत्तरकर (वय ३१, रा. एम. जी. रोड, खडकी) यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. महेश पोपट काटे (वय ३९, रा. काटेनगर, पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यातफिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये आरोपींकडून दरमहा चार टक्के व्याजदराने सहा लाख रुपये घेतले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून चारचाकी वाहनाचे कागदपत्र आणि दोन धनादेश घेतले. दरम्यान, फिर्यादीला वेळेवर व्याज देणे शक्य झाले नाही. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीच्या धनादेशावर १२ लाख रुपये इतकी दुप्पट रक्कम टाकून बाऊन्स केला. तसेच, फिर्यादीचे चारचाकी वाहन जबरदस्ती नेले. फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांच्या आई – वडिलांना धक्काबुक्की केली.