न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २९ डिसें.) :- कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी यावर्षीदेखील लाखो अनुयायी येणार आहेत. गतवर्षी १ जानेवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालं असून सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुणे पोलीस अधिक्षक संदीप पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी नवल किशोर राम यांनी कोरेगाव भीमा येथे काही अनुचित घडणार नाही याची आपल्याला ११० टक्के खात्री असल्याचा विश्वास व्यक्त केला.
विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. जड वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे. गर्दी नियंत्रित करण्याची व्यवस्थाही चोख करण्यात आली आहे. पार्किंगसाठी ११ जागा देण्यात आल्या आहेत. घातपात होऊ नये याकरता बीडीडीएसची सात पथकं, जिल्ह्याच्या सीमारेषेवर चेक पोस्ट्स, ५००० पोलीस कर्मचारी, १२ एसआरपीएफच्या तुकड्या, १२०० होम गार्ड्स, २००० स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० व्हीडिओ कॅमेरे लावण्यात आले आहेत. यामधील २० शिरूर तर २० हवेली तालुक्यात बसवण्यात येणार आहेत. १२ ड्रोन परिस्थितीवर नजर ठेवून असणार आहेत. यामधील सहा शिरूर आणि सहा हवेली तालुक्यात असतील.चाकणमध्येही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विजयस्तंभ आणि त्याच्यापासून सात ते आठ किमी परिसरात ३०६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ७ ते १० लाख लोक येतील हे गृहीत धरून तयारी करण्यात आली आहे.