- अनं ती दुर्घटनाकारक घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून. २०२१) :- राज्यात एकीकडे करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना, ऑक्सिजन गळतीच्या घटना समोर येत आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजन टँक भरताना लिकेज होऊन मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन गळती झाल्याची घटना घडली.
वायसीएम रूग्णलायाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एका ऑक्सिजन टँकरचा सेफ्टी वॉल लिकेज झाल्याने रूग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन गळती झाली होती. मात्र, सुदैवाने प्रशासन व अग्निशामक दलाने वेळेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने, नाशिक दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली.
ऑक्सिजन टँकमधून ऑक्सिजन गळती झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. तातडीने उपाययोजना करत गळती थांबविण्यात आली. घटनास्थळी महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, राजेंद्र वाबळे यांनी धाव घेतली होती. नागरिकांनी घाबरून जाण्याच कारण नाही असं अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी म्हटलं.