- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या सदस्यांची मेहनत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून. २०२१) :- एप्रिल आणि मे मध्ये प्राधिकरणातील उद्यानातील मुरमाड जागेत पिवळ्या झेफिर लिली ह्या फुलझाडांच्या बिया फक्त विखरून टाकल्या होत्या. लॉक डाऊनच्या काळात नागरिकांची वर्दळ उद्यानामध्ये नसल्यामुळे विखुरलेल्या बियांना नैसर्गिक वातावरण सहजच उपलब्ध झाले. उद्यानांमध्ये नागरिकांची उपस्थिती नसल्यामुळं व मे अखेरीसच्या पावसामुळे जून मध्ये बिया नैसर्गिकरित्या रुजल्या गेल्या, त्यामुळे सुंदर अश्या पिवळसर पावसाळी लिलीचे दर्शन होत आहे.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील म्हणाले,” झेफिर लिली हे मूलतः दक्षिण अमेरिकेतील फुल वनस्पती आहे. कंद सदृश झाडाला लांब दांडीची फुले पावसाळ्यात येतात म्हणून यांना “रेनी फ्लॉवर” असेही संबोधतात. अनेक फुलझाडे प्रेमी या झाडांची लागवड कुंड्यांमध्ये, टेरेसवर, बाल्कनीमध्ये करतात. नर्सरीमध्ये विविधरंगी गुलाबी, लाल, पांढऱ्या रंगामध्ये ते उपलब्ध असल्याचे दिसून येते. जून ते सप्टेंबर असा त्यांचा फुलण्याचा कालावधी असतो. थोडे ऊन आणि पाऊस अश्या पोषक वातावरणात ते उत्तम रीतीने फुलतात. छोट्या बिया पुन्हा रुजवता येतात.
पर्यावरण विभागाचे सदस्य अर्चना घाळी, संतोष चव्हाण,विजय मुनोत यांनी मुरमाड जागेत बिया उद्यानामध्ये विखरल्या असता जून च्या पहिल्या आठवड्यात रोपे उगवली आणि सुंदर फुले बहरली.


















