- प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शिरावर मोठी जबाबदारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने कोरोना विरोधात युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. महापालिकेने विविध अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या महत्वांच्या जबाबदाऱ्या सोपवून त्या निश्चित करण्यात आल्या आहेत. समन्वयाचा अभाव होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. तिसरी लाट अधिक तीव्र असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. त्यामुळे पालिकेची वैद्यकीय यंत्रणा अधिक सतर्क आहे.
तातडीच्या उपाययोजना व रूग्ण संख्या कोणत्याही परिस्थितीत वाढू नये. ती आटोक्यात ठेवणे असे नियोजन पालिकेने केले आहे. पालिका प्रशासनाने वायसीएम व जिजामाता रूग्णालयात बाल रुग्णांसाठी बेड आणि घरकुलात कोविड सेंटरची व्यवस्था केली आहे.
टास्क फोर्सची स्थापना केली आहे. मोठ्या खासगी रूग्णालयांना ही तसा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्याचे मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांवरील जबाबदाऱ्या :-
सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर (करोना वॉर रूमचे मुख्य समन्वयक) शहरातील सर्व वॉर रूम, क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी व महापालिका यांच्यात समन्वय ठेवणे. तिसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी व करोनाविषयक शासकीय व पालिका आदेशाची शहरात अंमलबजावणी करणे. अँटीजेन व आरटीपीसीआर चाचण्यांवर देखरेख ठेवणे.
सहायक आयुक्त प्रशांत जोशी (माहिती संकलन समन्वयक) :- ‘ मी जबाबदार ‘ अॅपद्वारे टेस्टींग लॅब, कोविड केअर सेंटर, रूग्णालयांकडून माहिती संकलन अचूक वेळेत होईल, करोना पोर्टल, आयसीएमआर पोर्टलवरील पालिकेची माहिती अद्ययावत राहील यावर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.
उपायुक्त संदीप खोत (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग समन्वयक) :- चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांना शोधणे, त्यांचा पत्ता, मोबाइल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक आदी माहिती घेणे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे १०० टक्के कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, त्यांचे १०० टक्के टेस्टिंग होईल. तसेच, मी जबाबदार अॅपवर नोंदणी होईल यावर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.
उपायुक्त मंगेश चितळे (जनजागृती समन्वयक) नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी संपूर्ण शहरामध्ये फ्लेक्स व होर्डिंग्ज लावणे. सर्व क्षेत्रीय कार्यालये व रूग्णालयांशी समन्वय ठेऊन जनजागृतीसाठी वृत्तपत्रे, माध्यमे, सोशल मीडियाच्या माध्यमातून नियोजन करणे. पालिकेचे सर्व विभाग शासकीय कार्यालये, मीडिया पार्टनर, स्वयंसेवी संस्था लोकप्रतिनिधी यांचा समन्वय ठेवणे उपाययोजनांचे नियोजन करणे.
















