- आरोपीकडून गुन्ह्याची कबुली..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२१) :- चिंचवड येथील हनुमान मंदिरासमोर शंकर गोविंद सुतार याचा धारदार शस्त्राने वार करून डोक्यात दगडी पाटा घालून खून करण्यात आला होता. ही घटना २२ ऑगस्ट २०२० ला घडली होती.
याप्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना आधीच अटक केली आहे. यापैकी तुषार झेंडे हा आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता. खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे शाखेने सोमवारी कात्रज येथे सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.
खंडणीविरोधी पथकातील संदीप पाटील व शैलेश मगर यांना सोमवारी गुप्त बातमीदारामार्फत आरोपी तुषार झेंडे हा नाव बदलून संतोषनगर, कात्रज येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन शोध घेतला असता आरोपी अंजनीनगर येथे भाड्याने खोली घेऊन राहत असल्याचे समजले. त्यानुसार शोध घेतला असता आरोपी संतोषीमाता मंदिराजवळ कोणाची तरी वाट पाहत उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची तोंडी कबुली दिली.
















