- त्या घटनेचा पोलिसांकडून २४ तासांच्या आत छडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२१) :- नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सोमवारी (दि. १४) एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी महिलेने टाचा रगडल्याचे व्रण दिसत असल्याने खुनाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र सांगवी पोलिसांनी २४ तासांच्या आत महिलेची ओळख पटविली.
घटस्फोटानंतर आलेल्या नैराश्यातून महिलेने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासत समोर आले आहे. कविता विनायक कडू (३९, रा. नांदेडसिटी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह नाशिक फाटा येथे आढळून आला. त्यानुसार सांगवी पोलिसांनी तपासाला सुरवात केली. पोलिसांनी सुरुवातीला सोशल मीडियावर महिलेचे छायाचित्र व्हायरल केले. त्यामुळे रिक्षावाल्याने महिलेला सोडल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसानी रिक्षावाल्याला गाठले. त्याने महिलेला मध्यरात्री नांदेडसिटी येथून नाशिक फाटा येथे सोडल्याची कबुली देत महिलेने आपल्याशी वाद घातल्याचे सांगितले. अधिक तपासात महिलेने दुसऱ्या रिक्षा चालकाला आपला भाऊ येणार असल्याने पुलावर सोडण्यास सांगितले. त्यानुसार त्या रिक्षा चालकाने तिला पुलावर सोडले. जर भाऊ आला नाही तर मला फोन करून बोलवा, मी आपल्याला घरी सोडेन असे त्या रिक्षावाल्याने सांगून त्या महिलेचा मोबाइल क्रमांक घेतला होता.