- राज्याच्या पोलीस महासंचालकांनी प्रस्ताव मागविला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२१) :- वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या पोलीस स्टेशनचा पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात समावेश होण्याची शक्यता आहे. पिपरी – चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे याबाबत प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावावर संबंधितांकडून तत्काळ अभिप्राय मागवला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामपंचायतींकडून यासंदर्भात अभिप्राय घेण्यास सांगितले आहे. तसेच ग्रामसभेतील ठराव व त्यावरील ग्रामसभेचा निर्णय संबंधित ग्रामपंचायतींकडून प्राप्त करून कार्यालयात त्वरित सादर करावा, असे निर्देश दिले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पिपरी, चिंचवड, निगडी, सांगवी, वाकड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, तसेच पुणे ग्रामीणमधील चाकण, आळंदी, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी व देहूरोड या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ओतूर, आळेफाटा, जुन्नर, नारायणगाव, मंचर, घोडेगाव, खेड, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, इंदापूर, वालचंदनगर, भिगवण, दौड, यवत, बारामती शहर, बारामती तालुका, जेजुरी, सासवड, भोर, राजगड, वेल्हा पौंड, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चाकण, आळंदी, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी व देहूरोड या पोलीस स्टेशनचा पिंपरी चिंचवड आयुक्तालयात समावेश झाला आहे. नव्याने वडगाव, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या पोलीस स्टेशनचा प्रस्ताव आहे.