- महावितरणाकडून घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२१) :- महावितरणद्वारे ग्राहकांसाठी अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांसाठी मोफत वीजजोड योजना सुरू झाली आहे. १४ एप्रिल ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज पुरवठ्यासंबंधी असणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्याबाबतही समावेश असेल, लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिका-याचे जाती प्रमाणपत्र आवश्यक राहील. अर्जासोबत आधार कार्ड, रहिवासी दाखला आवश्यक असेल अर्जदारांनी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी योजनेची कार्यपद्धती ऑनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज करता येईल.
शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. पाचशे रुपये अनामत रक्कम महावितरणकडे जमा करावी लागेल. सदर रक्कम ५ समान मासिक हफ्त्यांमध्येच भरता येईल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्युत नियामक आयोगाच्या तरतुदीच्या अधीन राहून वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल. ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही, अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसात वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.